सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांदलवाडी येथे नीरा डावा कालव्यात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत इसमाचे वय अंदाजे २८ ते ३० वर्षे असून, त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.
या घटनेप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मयत रजिस्टर क्रमांक ८४/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. पुढील वैद्यकीय कार्यवाही तसेच मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, बारामती येथील शवागृहात ठेवण्यात आला आहे.
मृत इसमाच्या अंगात फुल बाह्यांचा पांढऱ्या रंगाचा शर्ट असून, त्याखाली भगव्या रंगाचे बनियान आहे. या बनियानावर त्रिशूळ व ‘ॐ’चे चित्र आहे. कमरेला फिकट निळ्या रंगाची जीन्स पँट असून, आतील वस्त्र Macroman कंपनीचे आहे. तसेच गळ्यामध्ये पांढऱ्या रंगाची साखळी अथवा चेन असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या वर्णनावरून मृत इसमाची ओळख पटत असल्यास किंवा त्याचे नाव, पत्ता, नातेवाईक, तो बेपत्ता झाल्याची माहिती अथवा अन्य कोणतीही उपयुक्त माहिती नागरिकांकडे असल्यास तात्काळ बारामती शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
