सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुणे : प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. गणेश मंडळांच्या बैठकीत विसर्जन मिरवणुकीतील साऊंड सिस्टिमबाबत चार बेस आणि चार टॉप ठेवण्याच्या मर्यादेवर जवळपास एकमत झाले आहे. या मर्यादेपेक्षा अधिक साऊंड उपकरणे लावल्यास संबंधित मंडळावर थेट गुन्हा दाखल करून साऊंड सिस्टिम जप्त करण्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही मंडळांकडून अतिरिक्त बेस अथवा टॉप जोडून आवाजाची तीव्रता वाढविण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. चार बेस आणि चार टॉपच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रेशरमेड आणि प्लाझ्मावर बंदी
साऊंड सिस्टिमच्या संख्येव्यतिरिक्त प्रेशरमेड आणि प्लाझ्मा उपकरणांच्या वापरालाही मनाई करण्यात आली आहे. ही उपकरणे वापरल्याचे आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासोबतच उपकरणे जप्त केली जाणार आहेत. त्यामुळे मिरवणुकीत साऊंड सिस्टिमची संख्या तसेच वापरल्या जाणाऱ्या उपकरणांच्या प्रकाराचीही तपासणी पोलिसांकडून होण्याची शक्यता आहे.
नागरिकांच्या तक्रारींनंतर पोलिसांची कठोर भूमिका
गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या काळात कर्णकर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व्यक्ती तसेच निवासी भागातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत नागरिकांकडून आवाज उठविला जात आहे. उत्सवाला विरोध नाही; मात्र ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, अशी भूमिका नागरिकांकडून मांडली जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाईची जबाबदारी आयोजकांवर निश्चित केली जाणार आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले की, चार बेस आणि चार टॉपची मर्यादा ओलांडून अतिरिक्त साऊंड लावल्यास गुन्हा दाखल करून साऊंड सिस्टिम जप्त केली जाईल. प्रेशरमेड आणि प्लाझ्मासारख्या प्रतिबंधित उपकरणांचा वापरही सहन केला जाणार नाही. उत्सव साजरा करताना कायद्याच्या चौकटीचे पालन करणे आवश्यक आहे.
