सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी दिवाळी सणाचे औचित्य साधून पुणे येथील तरुण उद्योजक व बांधकाम व्यावसायिक देवेंद्र बाळासाहेब मगर यांनी सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाणेवाडी येथील सर्व १५२ विद्यार्थ्यांना मोफत स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप केले. बुधवार, दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी देवेंद्र मगर व त्यांच्या मित्रपरिवाराच्या हस्ते हा उपक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेससोबतच दिवाळीनिमित्त भरपूर खाऊचेही वाटप करण्यात आले. या अनोख्या भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित झाला.
या कार्यक्रमाला वाणेवाडीच्या सरपंच गीतांजली जगताप, पंचायत समिती सदस्य दिग्विजय जगताप, उपसरपंच अजित भोसले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश काकडे, माजी अध्यक्ष शंकरराव कोकरे, स्थानिक पालक समिती सदस्या अश्विनी जाधव, ऐश्वर्या जगताप, साद संवाद ग्रुपचे सदस्य शशिकांत जेधे देशमुख, केंद्रप्रमुख अश्विनी शितोळे, शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता कोंढाळकर यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, पालक व मगर यांचे मित्रपरिवार उपस्थित होते.
सरकारी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या मदतीबरोबरच समाजातील दानशूर व्यक्तींचे योगदानही महत्त्वाचे ठरत आहे. देवेंद्र मगर यांच्यासारख्या सामाजिक जाणिवेतून काम करणाऱ्या दातृत्वशील व्यक्तींमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत असून, शाळेच्या विकासालाही हातभार लागत आहे.
दिवाळीच्या आनंदात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा देवेंद्र मगर यांचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.




