सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर l प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल प्रतिटन ४ हजार रुपये मिळावी, अशी मागणी माजी संचालक महेश राणे यांनी केली आहे.
याबाबत कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारातून आणि मार्गदर्शनातून श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने महाराष्ट्रात एक नंबरचा कारखाना म्हणून नावलौकिक मिळवला आहे. कारखान्याच्या उत्कृष्ट कामकाजामुळे सभासद शेतकऱ्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.
नोव्हेंबर २०२५ मध्ये साखरेचा दर साधारणपणे प्रतिक्विंटल ३७०० रुपये होता. त्यामध्ये वाढ होऊन नोव्हेंबर २०२६ मध्ये साखरेचा दर साधारणपणे प्रतिक्विंटल ५२०० रुपये असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. देशभरात साखरेच्या दरवाढीसाठी आंदोलने सुरू असून, कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी प्रतिटन ३९०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे.
या पार्श्वभूमीवर सोमेश्वर कारखान्याच्या अतिउत्कृष्ट कारभाराचा आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नावाचा लौकिक कायम राखण्यासाठी ऊस उत्पादकांना प्रतिटन ४ हजार रुपये पहिली उचल जाहीर करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
अंतिम ऊस दर निश्चिचित करताना एकूण उत्त्पनातून 30% कारखान्याचा व्यवस्थापन व रूपांतरण खर्च वजा करून एकूण उत्त्पन्नातील 70% रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाचा भाव म्हणून देण्याच्या 70: 30 या फॉर्मुल्याचे अकाउंटींग स्टॅंडर्ड प्रमाणे पालन करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


